Sunday, February 2, 2020

अध्याय चौदावा


अध्याय चौदावा


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीसद्गुरूभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । 
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥

जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । 
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥

उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । 
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । 
सद्गुरूचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥

ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । 
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥

सद्गुरूभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । 
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥

तया सायंदेव द्विजासी । श्रीसद्गुरू बोलती संतोषीं । 
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥

ऐकोनि श्रीसद्गुरूचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
 माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥

जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू । 
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । 
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥

तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । 
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें सद्गुरूमूर्ति ॥११॥

माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । 
इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥

ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । 
सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥

प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । 
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥

जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । 
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।
 विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥

भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । 
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥

जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । 
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥

निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । 
अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥

तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । 
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥

ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । 
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥

कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
 ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥

विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
 विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीसद्गुरूसी ध्यातसे ॥२३॥।


कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥


गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
 तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीसद्गुरूची ॥२५॥

कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । 
श्रीसद्गुरूकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥

ज्याचे ह्रुदयीं श्रीसद्गुरूस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । 
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥

ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय । 
श्रीसद्गुरूकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥

ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
 सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥

ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । 
प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥

स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
 छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥

स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । 
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥

येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
 वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥

संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।
 गंगातीरीं असे वासर । श्रीसद्गुरूचे चरणदर्शना ॥३४॥

देखोनियां श्रीसद्गुरूसी । नमन करी तो भावेसीं ।
 स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥

संतोषोनि श्रीसद्गुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । 
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥

ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
 न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥

तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । 
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥

उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । 
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥

भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
 सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥

येणेंपरी श्रीसद्गुरूसी । विनवी विप्र भावेसीं ।
 संतोषोनि विनयेसीं । श्रीसद्गुरू म्हणती तये वेळीं ॥४१॥

कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
 पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥

आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । 
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥

न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेलीं दुःखें ।
 म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥

ऐसेपरी संतोषोनि । श्रीसद्गुरू निघाले तेथोनि । 
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥

समस्त शिष्यांसमवेत । श्रीसद्गुरू आले तीर्थे पहात । 
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥

नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । 
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥

गंगाधराचा नंदनु । सांगे सद्गुरूचरित्र कामधेनु । 
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥

पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । 
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥

इति श्रीसद्गुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम
चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥




श्रीसद्गुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीसद्गुरूदेव दत्त ॥




Share with your friend and family :


Related Posts:

  • अध्याय चौदावा अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीसद्गुरूभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।  प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥ जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसाग… Read More
  • समर्थ उपासना - नामस्मरण ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः | ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्ल्भाय नमः || 0 var add = (function () { var counter = 0; return function () {return counter += 1;} })(); function myFunction(){ do… Read More
  • मंगलाचरण | श्रीरामसमर्थ || || श्रीमत् दासबोध || समास पहिला : मंगलाचरण || १.१ || ॥श्रीरामसमर्थ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१|| ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्या… Read More
  • उपासना : प्रार्थना श्रीराम समर्थ || जय जय रघुवीर समर्थ || गुरु ब्रम्हा गुरु विष्णू  |  गुरुः देवो महेश्वरा | गुरु शाक्षात परब्रम्हा | तस्मै श्री गुरुवे नमः || ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।  द्वंद्वातीतं … Read More
  • Smarth Ramdas Swami’s Letter to Sambhaji MaharajSmarth Ramdas Swami’s Letter to Sambhaji MaharajSamarth Ramdas also known as Sant Ramdas or Ramdas Swami was an Indian Hindu saint, philosopher, poet, writer and spiritual master. He was a devotee of the Hindu deities Rama an… Read More

0 comments:

Post a Comment